Search This Blog

Monday, 7 November 2011

क्रिकेट हरले ! बाजार जिंकला!!


आयपीएल् तमाशा-
क्रिकेट हरले, बाजार जिंकला !
-अजित अभ्यंकर
पैसा, बाजार आणि नफा हा श्वासोच्छवास बनलेल्या समाजात अखेर क्रिकेटचे जे  व्हायचे तेच झाले.संघाचे संघटक-कॅप्टन गेले आणि मालक आले. खेळाडूंचे लिलाव झाले. निकालांचे फिक्सिंग झाले. चीअर गर्ल्सचे नाच झाले. खेळाचा तमाशा झाला.खेळाडूंचे नाचे झाले, आणि ते कॉर्पोरेटांनी केलेल्या ' दौलतजादा ' च्या नोटांमध्ये न्हाऊन निघाले.आणि तिकडे.....तिकडे,  देशाच्या कृषिमंत्रालयात शरद पवार तृप्त झाले.शेतीक्षेत्राचे बाजारीकरण करण्यासाठी निदान एक मॉडेल उपलब्ध झाले, याचे समाधान बाळगत, त्यांनी एक सुस्कारा सोडला.  
पण अखेर एखाद्या खुनाला वाचा फुटावी, तसा शशी थरूर आणि ललित मोदी यांच्यातील वादाचे गळू फुटले. आणि त्यातून वाहणाऱ्या द्रवातून, या आयपीएल् चा खरा हिडीस चेहरा जनतेसमोर आला. पैसा आणि बाजाराची ही व्यवस्था मानवी भावनांना किती गलिच्छ, विकृत रूप देवू शकते, हे आयपीएल् मधील ओंगळ वैयक्तिक स्पर्धेतून दिसून आले.
ही त्यातल्या त्यात बरी गोष्टच म्हणावी लागेल.
 कारण त्यामुळे, बाजार नियमांनी चालतो, असा कितीही  कांगावा केला तरी, तो तसा नसतो.पैशाची हाव, अहंकार आणि सत्तेची लालसा क्रिडेसारखे क्षेत्रदेखील किती खालच्या पातळीला नेऊ शकतात, हेच सत्य जनतेसमोर आले.
आयपीएल चे परीक्षण करू
थरूर, मोदी आणि सुनंदा यांच्या नावाने माध्यमांमध्ये सनसनाटी करण्याच्या नादामध्ये ही आयपीएल् स्पर्धा कशी कोणी का भरविली? त्याची पद्धती काय ? त्यात कोणाला किती आणि कशामधून पैसा मिळतो ? त्याचा उगम कोठे आहे ? या प्राथमिक माहितीचा तपशील वाचकांना कधीच समजावून सांगितला गेला नाही. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम हा तपशील समजावून घ्यावा लागेल. मगच त्याचे विश्लेषण करता येईल.
आयपीएल् स्पर्धा म्हणजे इंडियन प्रिमिअर लीग या नावाने चालणारी निमंत्रितांची क्रिकेट सामन्यांची साखळी. त्याचे संघटक आहेत, बोर्ड
ऑफ क्रिकेट कन्ट्रोल ऑफ इंडिया(BCCI). बीसीसीआय् नेच स्थापन केलेल्या आयपीएल् नावाच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जाते. त्या  बीसीसीआय् चे अध्यक्ष शरद पवार आहेत. आयपीएल् ही काही एखादी स्वतंत्र संस्था नाही. तो बीसीसीआय् चाच एक विभाग आहे. त्याचे हिशेब आणि आर्थिक व्यवहार हे बीसीसीआय् च्याच अंतर्गत आहेत.
 त्यामुळे हे जे काही घडते आहे, त्याचे कर्ते आणि करविते सर्वोच्च नेते शरद पवार आहेत, हे सत्य आतापर्यंत माध्यमांनी आपल्याला कधीच सांगितले नाही.
या सामन्यांची पद्धती अशी आहे.
  1. सामने कोणामध्ये होणार ? अर्थात् संघांची निवड- कोणतीही क्रिडा स्पर्धा म्हणली की, पहिला प्रश्न असतो की, त्यामध्ये जे संघ खेळणार, ते कोणते असणार? सामान्यतः हे संघ कोणते असतात ? पश्चिम विभाग, उत्तर विभाग इ.  असे विभाग किंवा महाराष्ट्र, गुजरात इ. अशी राज्ये किंवा भारत, वेस्ट इंडिज् इ. असे देश किंवा  एखाद्या विभागातील सर्व महाविद्यालये, किंवा शाळा  किंवा ज्या कोणा संघाला भाग घ्यायचा आहे, असे सर्व इच्छुक संघ,  अशा कोणत्याही प्रकारे संघ ठरवून त्या त्या पातळीवरील क्रिडा नियंत्रक संस्थांना तसे कळविले जाते. आणि त्या त्या संस्था आपापले संघ पाठवितात. ही झाली नेहमीची पद्धती.                              पण  आयपीएल् स्पर्धांमध्ये मात्र त्याची जागा घेतली ओंगळ आणि हिडीस  अशा बाजारीकरणाने. म्हणजे संघ किती असतील याची संख्या(आजपर्यंत ८ आणि आता १०) आणि त्यांची नावे आयपीएल् संचालकांनी अगोदर निश्चित केली.मग ते संघांच्या मालकीचा लीलाव करण्यात आला. त्यामध्ये शाहरूखखान , अंबानी, विजय मल्ल्या, यासारख्या कोर्पोरेटस् आणि  बड्या धनदांडग्यांनी  रेसचे घोडे विकत घ्यावे त्याच सरंजामदारी थाटात जाहीर लीलावांमध्ये त्या त्या संघांच्या मालकी विकत घेतल्या. आणि भारताच्या इतिहासात प्रथमच क्रिकेटच्या संघांना खाजगी मालक निर्माण झाले.संघांची नावे आणि त्यांच्या किंमती खालील प्रमाणे-                                              संघ                   मालक            किंमत रूपये
·   मुंबई इंडियन्स          मुकेश अंबानी                   ४४५ कोटी
·   रॉयल चॅलेंजर्स         विजय मल्या                     ४४०कोटी
·  डेक्कन चार्जर्स         डेक्कन क्रॉनिकल्स(गायत्री रेड्डी)४२२कोटी
·  चेन्नई सुपर किंग्ज     श्रीनिवासन् ( इंडिया सिमेंट्स)           ३५९कोटी
·  दिल्ली डेअरडेव्हील्स   जीएमआर् ग्रुप                   ३३१ कोटी
·  किंग्ज ११ पंजाब      नेसवाडिया,प्रिती झिंटा                     ३००कोटी
·  कोलकाता नाईट रायडर्स         शाहरूखखान, जय मेहता     २९६कोटी
·  राजस्थान रॉयल्स      शिल्पा शेट्टी, राज कुन्द्रा       २६४कोटी
·  सहारा पुणे वॉरिअर्स   सहारा(सुव्रतो बॅनर्जी)                १,७६२कोटी
·  कोची                    रेंडेव्हू स्पोर्ट्स लिमिटेड      १,३९२कोटी
  1. खेळाडूंची निवड अर्थात घोडेबाजार- संघ ठरले. आता प्रश्न आला खेळाडू कोण असतील याचा. मालकांना जे आवडतील तेच खेळाडू असणार, हे तर नक्कीच. पण मालकांना चांगले खेळाडू हवे असतील, तर ते कसे मिळणार ? त्यासाठी पुन्हा त्या मालकांच्यात खेळाडूंचा लीलाव करण्यात आला. प्रत्येक खेळाडूला काही एक दर्जा ठरविण्यात आला. जसे खिल्लारी  बैल किंवा अरबी घोडे , यांना जास्त किंमत येते त्याच प्रकारे तेंडुलकर, धोनी यांच्यासाठी वेगळा दर्जा निश्चित करण्यात आला. असे विविध प्रकारांचे बिल्ले लावलेले घोडे -बैल किंवा गुलाम विकत घ्यावे त्याच प्रकारे, तरूणांच्या हृदयांचे हिरोज् विकले जाताना सर्व माध्यमांच्या पडद्यावर आपण पाहिले. कोट्यावधी रूपयांची दौलतजादा करून सुमारे १२० खेळाडू विकत नाचविण्यात आले.  धोनी आणि तेंडुलकर , रेसमध्ये पळणाऱ्या घोड्यांप्रमाणे अंबानी आणि मल्ल्या या जॉकिज् समोर माना खाली घालून उभे असलेले जेंव्हा दिसले, त्या दिवशी भारतातील सर्व क्रिकेटची मैदानेसुद्धा ढसढसा रडताना दिसली.कारण त्या दिवशी भारतातील क्रिकेट हरले होते. बाजार जिंकला होता.
  2. खेळाचे नियमदेखील बदलले- एकदा बीसीसीआय् आणि सर्व प्रख्यात खेळाडूंना विकत घेतल्यावर क्रिकेटचा खेळच आपल्या मालकीचा झाला, असे या संघमालकांना वाटू लागले, तर त्यात आश्चर्य कोणते ? त्यांनी खेळाची तिकीटविक्री वाढविण्यासाठी खेळाचे नियमच बदलले.खेळाचा ३ तासाचा सिनेमा करायचा असल्याने, त्याची लांबी कमी करणे आवश्यक होते. त्यामुळे  प्रथम ओव्हर्सची संख्या ५०वरून २० केली. बॅटीचा नियमित आकार बदलला. हँडल मोठे केले. बाऊंड्रीज् ची सीमारेषा आखूड केली, ज्यामुळे अधिक सहजतेने बाऊँड्रीज् आणि सिक्सर्स मारता येतील. थोडक्यात क्रिकेटचे रूपांतर अमेरिकन बेसबॉलमध्ये केले. कथ्थक पाहण्यासाठी गेलेल्याला ब्रेकडान्स पहायला मिळावा, तसा हा प्रकार होता. 
  3. सत्तेचा गैरवापर आणि देशाची लूट- आता सामने सुरू करायचे म्हणजे त्याची तिकीटविक्री जोरदार व्हायला हवी. त्यासाठी चीअर गर्ल्स ची योजना करण्यात आली. स्टेडियममध्ये लाईव्ह संगीत आणण्यात आले. सध्या       नवश्रीमंत सरंजामदारांच्या लग्नात खरे हत्ती, घोडे, उंट आणतात,त्याच प्रकारे.आता या सर्वाला क्रिडा म्हणणे वेड्याला सुद्धा  शक्य झाले नसते.कारण हा तर सरळ सरळ एक करमणुकीचा तमाशा होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने मंत्रिमंडळात २० जानेवारी २०१०रोजी त्याबाबत एक ठराव केला, आणि या तमाशावर तिकिटाच्या २५ टक्के दराने करमणूक कर आकारण्याचे निश्चित केले. पण नंतर बहुधा भारताचे कृषिमंत्री शरद पवार यांना असे वाटले असावे की, जर या मुळे तिकिटाचे दर वाढले, तर माढा किंवा मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना (आत्महत्या करण्यापूर्वी एकदा तरी) या चीअर गर्ल्सचा नाच पाहणे किंवा दारिद्र्यरेषेखालील लोकांना मॅच पाहणे कदाचित् परवडणार नाही. त्यामुळे  या गरीबांच्या हक्कांचा विचार करून, त्यांनी अशोक चव्हाण यांना आदेश दिला की, हा करमणूक कर तात्काळ रद्द करा. महसूलमंत्री नारायण राणे हे फारसे काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. कारण शिवसेना भाजपा युतीच्या काळात मायकेल जॅक्सन् च्या संस्कृतीसंवर्धक नाचावरचा करमणूक कर त्यावेळचे (युव)राज ठाकरे आणि नीलेश राणे यांच्या पॉकेटमनीसमाजसेवेसाठी युती सरकारने मोठ्या खुशीने माफ केलेला होता.त्याचा अनुभव त्यांच्या आणि सरकारच्या गाठीशी होताच. अशोक चव्हाण आणि अजित पवार शरदरावांनी हे राज्य अशा प्रकारे मिळून मिसळूनच चालवायचे ठरविल्याने महाराष्ट्र राज्याचा फक्त ५००कोटी रूपयांचा करमणूक कर बुडाला. धान्यापासून देशी दारूची गरीबांमध्येच जास्त विक्री करून मागील वर्षापेक्षा १ हजार कोटी रूपयांचा अधिक महसूल मिळवावयाचा असा निर्धार, गरीबांच्या कल्याणासाठी अग्रेसर असणाऱ्या पुरोगामी  महाराष्ट्राच्या या चव्हाण-पवारांनी केलेला असल्याने, त्यांनी या ५००कोटी रूपयांच्या बुडालेल्या कराची फारशी फिकिर केलेली नाही. राज्यात सामान्य जनता टेलिफोन-वीजेच्या बिलांवर, औषधे आणि कापडाच्या खरेदीवरदेखील  १२टक्के दराने कर देत असली तरी, हजारो रूपयांची तिकिटे विकत घेऊन बीअरचे घटके घेत सामने पाहणाऱ्या उच्च मध्यमवर्गाला मात्र  हे तमाशा क्रिकेटसामने कोणत्याही कराशिवायच पाहता आले.ते या सरकारच्या पुरोगामी दृष्टिकोनामुळेच.    
  4. पोलिस यंत्रणा व वीजेचा भयानक अतिरिक्त वापर- या आयपीएलचे तमाशासामने दिवसा न खेळता रात्रीच खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी देशातील जनता उन्हाळ्याच्या  दिवसात १० ते १४ तास भारनियमनामध्ये होरपळून निघत असताना, इतक्या प्रचंड प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.संघाचे मालक, त्यांचे (गुलाम) खेळाडू आणि प्रेक्षकांची सुरक्षा राखण्यासाठी प्रचंड प्रमाणात पोलिसांना गुंतून रहावे लागले. त्यासाठी कितीतरी प्रमाणात राज्याचा खर्च झाला. त्यासाठी कोणताही आकार या तमाशाच्या संघटकांकडून घेण्यात आला नाही.
  5. बीसीसीआय् कडून विश्वास घात आणि काळ्या पैशाची गटारगंगा -आयपीएल् ही स्वतंत्र संस्था नाही. ती बीसीसीआय् नावाच्या सार्वजनिक हितासाठी स्थापन झालेल्या सोसायटीचे एक उपांग आहे. म्हणजेच तिचा कार्योद्देश बीसीसीआय् पेक्षा निराळा असूच शकत नाही.कोणत्याही परिस्थितीत आयपीएल ही नफा मिळविण्यासाठी किंवा कोणा इतरांच्या नफ्यामध्ये वाटा मिळविण्यासाठी काम करू शकत नाही. आयपीएल् चे अधिकार ललित मोदी नावाच्या एका उद्योगी दलालाकडे सोपविण्याचे शरद पवार हे बीसीसीआय् चे अध्यक्ष होताच त्यांनी ठरविले. किंबहुना शरद पवार हे बीसीसीआय् चे अध्यक्ष होणे आणि ललित मोदींच्या प्रमुखपदाखाली आयपीएलची सुरूवात होणे, हा केवळ योगायोग नाही. तर शरद पवार यांनी आयपीएलचे नियोजन मोदी यांच्याकडून शिकून, त्यांच्याबरोबर समझोता करूनच हे पद मिळविण्यासाठी सर्व प्रकारच्या योजना  केल्या असणार, हे अगदी उघड आहे. २०१२ मध्ये या आपीएल चे रूपांतर एका कंपनीत केले जाणार असून ती शेअरबाजारात नोंदविली जाणार असल्याचे सांगितले जाते. ते खरे असो अथवा नसो, पण अशा प्रकारचा पैशाचा तमाशा संघटित करणे किंवा कंपनीसाठी प्रवर्तक असल्याप्रमाणे बीसीसीआय् ने काम करणे, हा विश्वासघात असून ते उघडपणे बेकायदेशीर आहे. त्यासाठी सार्वजनिक संस्था कायदा १८६० आणि सार्वजनिक न्यासाचा कायद्यांतर्गत त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे आणि दिवाणी दावे दाखल करण्याची गरज आहे. आपीएलला या सामन्यांच्या केवळ भारतातील  प्रक्षेपण हक्कांच्या विक्रीमधून सोनी एंटरटेनमेंट आणि वर्ल्ड ग्रुप सिंगापूरमधील कंपन्याकडून   येत्या दहावर्षांत ८हजार ७०० कोटी रूपये मिळणार आहेत.परदेशांमध्ये प्रक्षेपण हक्कांच्याविक्रीमधून मिळणाऱ्या पैशाचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.त्यापैकी २० टक्के पैसे आयपीएलला मिळतील, ८ टक्के पैसे बक्षीसाची रक्कम म्हणून दिली जाईल, तर ७२ टक्के रक्कम या संघाच्या मालकांना मिळेल. म्हणजे ६,२६४ कोटी रूपये सध्या ८संघ मालकांमध्ये वाटले जातील.त्याशिवाय प्रत्येक सामन्याची तिकिटविक्री, त्या ठिकाणची जाहिरात, खेळाडूंच्या कपड्यांवरील जाहिराती, अंपायर्सवरी जाहिराती ,यातून कित्येक शेकडो कोटी रूपये वरीलप्रमाणे संघमालकांना मिळणार आहेत. त्यातून  किती टक्के नफ्याचा दर त्यातून त्यांना पडतो याचा अंदाज न केलेलाच बरा.तो किमान १००टक्यांपेक्षा कितीतरी जास्त असेल, असा एक अंदाज  आहे. त्यामुळे   एका अंदाजानुसार ह्या आपीएल् ब्रँडचे बाजारमूल्य १८,७००कोटी रूपयांचे आहे.
  6. मोदी थरूर तमाशा या पैशामुळेच- २००८ आणि २००९ मध्ये अशा प्रकारचा पैशाचा पाऊस संघ मालकांवर होताना पाहून इतर उद्योगपतींवर आणि काळ्यापैशाच्या निर्मात्यांच्या तोंडाला पाणी सुटले नाही, तरच आश्चर्य. पण ते इतके सोपे नाही. कारण  साहजिकच पहिल्या ८ संघमालकांचा त्याला काही विरोध असणे अपेक्षित होते. ते सर्व विचारात घेऊनच पुणे आणि कोची या नावाखाली दोन नवे संघ आयपीएलमध्ये समाविष्ट करण्यासाठी राजकीय आणि आर्थिक असे दोन्ही वजन आवश्यक होते. त्यामध्ये असणाऱ्या प्रचंड नफ्या्मुळे त्यासाठी मोठी स्पर्धा होती. त्यामध्ये शशी थरूर- सुव्रतो बॅनर्जी यांच्यासारखे सोनिया गांधी आणि कॉंग्रेसच्या वर्तुळातील नवे तारे  प्रत्येकी १७०० कोटी रूपयांची थैली संघटित करून पुढे आले. इतके पैसे आणि राजकीय वजन पाहून शरद पवार यांनी त्याचे स्वागत करणे अपेक्षितच होते. नव्या २ संघाचा समावेश त्यामुळे करण्यात आला. पण त्यासाठी मोदी यांना जास्त रक्कमेच्या ऑफर्स असल्याने ते नाराज झाले.शिवाय मोदी हे आयपीएलचे प्रमुख असल्याने, त्यांनी आयपीएलच्या प्रत्येक कंत्राटात  स्वतःचा म्हणून मोठा असा खाजगी  वाटा कायम ठेवला आहे. त्यातूनच त्यांनी गेल्या ३ वर्षांत त्यांनी  जेट विमानापासून खाजगी बोटी, बीएमडब्ल्यू , मर्सिडिज् कार्सचा ताफा खरेदी केलेला आहे. अब्जावधी रूपयांच्या काळ्या उत्पन्नामध्ये जास्त वाटेकरी असणे,  त्यांच्या डोळ्यात सलू लागले. आणि चिडून त्यांचा तोल गेला. त्यांनी शशी थरूर यांचे भांडे उघड केले. चोरांच्या टोळीमध्ये ज्याप्रमाणे अखेरीस परस्परांमध्येच गळे कापण्यास सुरूवात होते. तसेच हे झाले. मोदी यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर छापे घालण्यात आले. त्यांना निलंबित करण्यात आले. आणि अमीन यांची नेमणूक त्यांच्या जागी करण्यात आली.खरे तर  मोदी यांच्याविरोधात सहा महिन्यांपूर्वी आयकर खात्याचा अहवाल तयार होता. पण त्यांचे आयपीएलमधील शरद पवार यांच्याबरोबरीचे संबंध विचारात घेऊन आयकर खात्याने त्यांना हात लावलेला नव्हता. त्यांच्या अहवालामध्ये मोदी आयपीएलच्या कोणत्या व्यवहारात किती वैयक्तिक फायदा करून घेतला, याचा सर्व तपशील जमविण्यात आलेला असून, तो इकॉनॉमिक् टाईम्सने प्रकाशितदेखील केलेला आहे. मोदी हा मनुष्य अतिशय संशयास्पद चारित्र्याचा असून त्याला १९८५ मध्ये अमेरिकेमध्ये माणसाचे अपहरण आणि गंभीर दुखापत करण्याच्या प्रकारात अटक होऊन शिक्षादेखील झालेली आहे.
  7. शेवटी हा आयपीएलचा कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच आहे.प्रश्न आहे, अशा परिस्थितीत जनतेने आणि क्रिकेटप्रेमींनी काय केले पाहिजे ? माझ्या मते क्रिकेटचा असा तमाशा होताना गप्प बसणे आणि तो झाल्यानंतर तिकिटे काढून अथवा घरी दूरदर्शनवर तो पाहणे म्हणजे, त्यामध्ये भागीदारी करण्यासारखेच आहे. क्रिकेटप्रेमींची ही प्रथम जबाबदारी आहे की, त्यांनी या सामन्यांवर पूर्ण बहिष्कार घातला पाहिजे. दुसरे म्हणजे यामध्ये आयकर खाते, आर्थिक गुन्हे शाखा, धर्मादाय आयुक्त यांनी एकत्रितरीत्या काम करून, ललित मोदी, शशी थरूर, बीसीसीआय् चे सर्व संचालकमंडळ आणि अध्यक्ष शरद पवार  यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत . आयपीएलचे संघमालक त्यांचे भागीदार त्यांच्या सर्व उत्पन्नाची, व्यवहारांची  आणि करदायित्वाची पूर्ण चौकशी केली पाहिजे. त्याची सर्व कागदपत्रे जनतेला खुली केली पाहिजेत.  तिसरे म्हणजे या तमाशाला करमणूक करातून माफी देणारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री नारायण राणे आणि  संबधित निर्णय करणाऱ्या घटकांवर विश्वासघाताचा गुन्हा  दाखल केला पाहिजे.त्यांच्या मालमत्तेवर टाच आणून त्यातून बुडालेल्या ५०० कोटी रूपयांची वसूली केली पाहिजे.
  8. इतर खेळांच्या विकासासाठी ह्या निधीचा विनियोग या सर्व प्रकारातून जे काही कर उत्पन्न प्राप्त होईल, ते खोखो कबड्डी, मल्लखांब यासारख्या  सर्व देशी खेळांच्या तसेच फूटबॉल , हॉकी यांच्या विकासासाठी सर्व राज्यांत देशात तज्ज्ञ व्यक्तिंच्या मार्गदर्शनाखाली खर्च केले पाहिजे.
-अजित अभ्यंकर

No comments:

Post a Comment