ज्ञानावर नियंत्रण कोणाचे नफेखोरांचे की समाजाचे ?
-अजित अभ्यंकर
एका बाजूला प्रगती आणि ज्ञानस्वातंत्र्य तर दुसऱ्या बाजूला मक्तेदारी नफ्याच्या लालसेमधून निर्माण झालेला स्वामित्वाचा अधिकार यांच्यामधून संगणकीय क्षेत्राची सध्या वाटचाल सुरू आहे. संगणकाच्या सर्वव्यापित्वामुळे हा संघर्षही सर्वव्यापी होतो आहे.भविष्यामध्ये त्याचे महत्त्व जास्त प्रमाणात वाढत जाणार आहे. त्याचा आपल्याला मागोवा घ्यायचा आहे. कारण हा प्रश्न केवळ तांत्रिकतेमधून निर्माण झालेला नाही.तर त्यामागे काही प्रगतीशील शक्ती आणि नफेखोर कंपन्या यांच्यातील संघर्ष आहे. त्यांचे हितसंबंध जपणारी साखळी आहे. त्याचा आपल्या वेध घेऊन भूमिका घ्यावीच लागणार आहे. म्हणून हा लेख.
आजच्या आपल्या जीवनाची आपण संगणकाशिवाय कल्पनादेखील करू शकत नाही. आपल्या जन्म मृत्यूची नोंद करण्यापासून आपल्या शाळा महाविद्यालयातील निकाल, आणि न्यायालयाच्या नोंदीपासून वृत्तपत्रे -पुस्तक प्रकाशने ,इस्पितळे, छापखाने, विमाने , रेल्वे, मोटारगाड्या , दूरध्वनी , बँका, विमा यासारख्या सर्व सेवा ,त्याचप्रमाणे आपल्या आपल्या जीवनातील अनेक कार्ये ,कारखान्यातील, घरातील, हातातील सर्व यंत्रामुळे व साधनांमुळे स्वयंचलित झालेली आहेत. इतकेच काय आधुनिक युद्धेदेखील स्वयंचलित शस्रांच्या आणि यानांच्याच जोरावर लढली जात आहेत. कारण यंत्रे समजदार झालेली आहेत. आपल्याला नेमके काय घडवता येईल याचे सर्व पर्याय यंत्रावर दृष्य स्वरूपात ती दाखवितात.काय करायचे ते सांगतात. उपलब्ध अनेक पर्यायांमधून निवड करून , त्याची सूचना यंत्राला दिली की, त्याचे कार्यवाही कशी करायची याचा निर्णय ते यंत्र स्वतः करते. मग तो छापखाना असो ,बँकांतून पैसे काढण्याचे-भरण्याचे कार्य असो, विमानाचे नियंत्रण असो, की लोखंडाला आकार देणारे लेथ यंत्र असो. कारण ही यंत्रे दिसायला जरी यंत्रे असली त्यामागे आपल्याला न दिसणाऱ्या , संगणकाप्रमाणे काम करणाऱया सूक्ष्म जोडण्या असतात. त्या यंत्रांचा अविभाज्य असा भाग असतात. त्यांचे कार्य चालते काही संगणकीय प्रणालींच्या आधारावरच. संगणकीय प्रणाली याचा अर्थ यंत्राला काम करण्यासाठी दिलेल्या सूचनावली. म्हणजेच आपले जीवन मोठ्या प्रमाणावर यंत्रे चालवितात, आणि त्या यंत्रांना संगणक प्रणाली चालवितात. म्हणजेच आपल्या जीवनाचे सर्व संचालन आता या संगणक सूचनावल्यांच्या हातामध्येच गेलेले आहे.
असे असेल तर, या सूचनावलींच्या नियंत्रणामध्ये फार मोठी सत्ता असेल, यात शंकाच नाही.म्हणूनच प्रश्न येतो की, या संगणक सूचनावलींना कोण घडवितो आणि नियंत्रित करतो? आणि तिथेच आहे सर्व रहस्याची मेख. या सूचनावली म्हणजे एक गुप्ततेमध्ये दडवलेला खजिन्याचा मंत्र बनला आहे. जणू देवाशी संवाद करण्याची गुप्त भाषाच.त्या संगणक सूचनावलींवर आज नियंत्रण आहे, ते काही जगड्व्याळ खाजगी मक्तेदार कंपन्यांचे. संगणकाला किंवा यंत्रांना कार्यान्वित करणाऱ्या या सूचनावलींवरील नियंत्रणातून अब्जावधी डॉलर्सच्या नफ्याचे साम्राज्यच त्यांनी उभारले आहे.मुक्तता , बौद्धिक स्वातंत्र्य, किमान मानवी सामाजिक व्यवहार या सर्वांना स्वामित्व अधिकाराची बेडी ठोकण्यात आलेली आहे. त्यासाठी कित्येक कायदे, आंतरराष्ट्रीय करार, संस्था, हेरगिरीची साधने निर्माण करण्यात आलेली आहेत. यातून संगणकीय क्षेत्र म्हणजे गुप्ततेचा एक तुरूंग बनले आहे. त्यामुळे आज अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्या उभ्या राहिल्या आहेत.पण त्यातून खरे तर , संगणकीय सूचनावलींचा विकास होण्यामध्ये मोठे अडथळे निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये कित्येक दोष आणि विकृती निर्माण झालेल्या आहेत. म्हणजेच एका बाजूला प्रगती आणि स्वातंत्र्य तर दुसऱ्या बाजूला स्वामित्वाचा अधिकार आणि लुटारू स्वरूपाच्या मक्तेदारी नफ्याची लालसा यांच्यामध्ये संगणकीय क्षेत्राची वाटचाल सुरू आहे.
काही संगणक पंडितांपुरता हा प्रश्न मर्यादित नाही. तो थेट एक सामाजिक आणि आर्थिक-राजकीय निवडीचा प्रश्नदेखील बनतो आहे. आणि येत्या काळामध्ये तर जास्त जास्त प्रमाणात बनणार आहे.कारण उत्पादनाची साधने विकसित होत जातात,तंत्र विकसित होत जाते. पण त्यांच्या विकासाच्या आड येतात ते सामाजिक संबंध. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे, तर संगणक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती आज शक्य आहे, त्यामध्ये त्यांच्यावरील स्वामित्वाच्या कल्पनेमधून मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. तो दूर करणे ही समाजाची गरज आहे. कारण त्यामुळे आपल्याला कमी दर्जाच्या,वारंवार कोसळणाऱ्या , महाग आणि कमी विश्वासार्ह संगणक प्रणाली घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे कदाचित एखादी मोठी आपत्ती देखील येऊ शकते. याची जाणीव ठेवून आपण .या विषयाचा विचार केला पाहिजे.या स्वामित्व अधिकाराने बध्द प्रणाली आणि मुक्त संगणक प्रणाली यांच्यातील भेद काय आहे ?त्याचे कारण काय ?त्यातून मार्ग कोणता ? याचा विचार केला पाहिजे, निवड केली पाहिजे, म्हणून हा लेख.
संगणक प्रणाली म्हणजे काय ? किमान तांत्रिक स्पष्टीकरण-
संगणक प्रणालीवर स्वामित्व असावेत की नाही, याचा निर्णय करण्यासाठी संगणकामध्ये नेमके काय होते, त्याची किमान माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. संगणकाने जी कामे करायची ती करण्यासाठी त्याला तपशीलवार सूचना आणि वेळापत्रक द्यावे लागते.त्याला संगणकप्रणाली किंवा सूचनावली किंवा कार्यप्रणाली (Computer Programme) म्हणतात. प्रत्येक संगणक कोणती कार्ये करेल, ते त्याच्या स्मरणामध्ये कोणत्या कार्यप्रणाली ठेवण्यात आलेल्या आहेत, यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या संगणकामध्ये गणिते करण्याची किंवा मराठीमध्ये लेखन करण्याची कार्यप्रणाली भरूनच ठेवली नाही, तर तो ती कार्ये करणारच नाही. ती कार्यप्रणाली संगणकावर टाकण्यासाठी कोणीतरी ती विकसित केलेली पाहिजे.एकदा अशी कार्यप्रणाली विकसित केली म्हणजे, ती सामान्यतः तेवढी यंत्रसामग्री असणाऱ्या कोणत्याही संगणकावर ती टाकणे शक्य होते. ज्या प्रमाणे एखाद्या मुलाला एखाद्या अज्न्यात ठिकाणी पाठविण्यासाठी, त्याल समजणाऱ्या भाषेमध्ये , ज्या प्रमाणे काही तपशीलवार सूचना द्याव्या लागतात, त्याच प्रमाणे संगणकाला या सूचना दिल्या की तो ती ती कार्ये करतो. आता त्याच सूचनांचा संच तयार झाला की तो त्या क्षमतेच्या कोणत्याही संगणकाला ते कार्य शिकविण्यासाठी वापरात आणता येतो. ती एक सर्वसाधारण कार्यप्रणाली बनते. मग जो कोणी तो संगणक संच चालवेल, त्याला फक्त कोणती कळ दाबली असता काय घडते , ही माहिती असली की, तो त्या संगणकाकडून ती ती कार्ये करवून घेऊ शकतो. जसे एखादी गाडी चालविणाऱ्याला त्या गाडीचे यंत्र आत काय करते याची काहीही माहिती नसली , तरी गाडी चालविण्यामध्ये काहीही अडचण येत नाही, त्याच प्रमाणे हे आहे. त्याचमुळे संगणकप्रणाली , सूचनावली विकसित करणारा आणि संगणक वापरणारा यात मोठा फरक आहे.
मुद्दा आहे तो संगणकाला विविध कार्ये करण्यासाठी अत्यावश्यक अशा सूचनावलींवर मालकी किंवा नियंत्रण कोणाचे असावे ? त्याचा वापर करण्यासाठी कोणाला, किती, कोणते, स्वातंत्र्य असावे किंवा नाही,याचा.
(संगणक जी कार्ये करतो त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे, माहितीचे संकलन , स्मरण ,संस्करण, गणन, संज्ञापन आणि पुनःसादरीकरण.तसेच अत्यंत कठीण गणितीय कार्येदेखील संगणक करू शकतो.मग ती माहिती किंवा गणिते कितीही मोठ्या आकाराची , गुंतागुंतीची असली तरी.. जे काम मानवी शक्यतांच्या कोटीमध्येदेखील नाही, माहितीचे स्मरण आणि त्यावरील प्रक्रियेचे कार्य संगणक करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या शहराच्या लोकसंख्येची सर्व माहिती स्मरणात ठेवून, एका क्षणामध्ये तुम्हाला पाहिजे त्या स्वरूपामध्ये त्याचे सूसूत्रीकरण किंवा विभाजन करून संगणक सादर करू शकतो. एखाद्या मोठ्या ग्रंथालयांतील लाखो पुस्तकांची सर्व पाने स्मरणात ठेवून त्या सर्वांतून तुम्हाला हवा तो शब्द किंवा अक्षरदेखील संगणक तुम्हाला क्षणार्धात शोधून देवू शकतो.
संगणकाची ही क्षमता ज्या एका मुख्य भौतिकी वास्तवावर उभी आहे, ते म्हणजे संगणकामध्ये ही सर्व माहिती साठविण्यासाठी विशिष्ट सिलिकॉनपासून बनविलेल्या सूक्ष्म चिप्स. अतिसूक्ष्म वीजेचा प्रवाह सुरू राहिल की बंद होईल म्हणजे अनुक्रमे ० आणि १ या स्वरूपामध्ये सर्व माहितीचे रूपांतर केले जाते. म्हणजेच आपण एखादे अक्षर संगणकाला सांगितले, किंवा एखादे चित्र दिले, तरी त्याचे रूपांतर संगणक ० आणि १ याच दोन मूळाक्षरी भाषेत लिहतो. थोडक्यात A हे अक्षर लिहण्यासाठी त्याच्याकडे एक ०१ यांनी बनलेली संख्या असेल. तसेच प्रत्येक अक्षरासाठी किंवा माहितीच्या प्रत्येक तुकड्यासाठी सोळा आकडी संख्या असेल. आपण A असे अक्षर लिहले तर ते संगणकाच्या चिप्सना समजणार नाही. किंवा एखादी सूचना द्यायची असली तरी ती ०१ च्याच भाषेत द्यावी लागेल.
तीच भाषा यंत्राला समजते.संगणकांच्या सुरूवातीच्या काळामध्ये संगणकांची क्षमता अतिशय मर्यादित होती. सर्व माहिती भोके पाडलेल्या कार्डांच्या माध्यमातून दिली जात असे. पण संगणकांतील चिप्सचे इलेक्ट्रॉनिक्सचे तंत्र जसे विकसित झाले तसे तसे या स्वरूपामध्ये संगणक सूचनावली तयार करणे हे फार वेळखाऊ झाले असते. तसेच त्यातील पुनरावृत्तीचा भाग फार मोठा आणि अनावश्यक होत गेला. त्यामुळे संगणकाला द्यायच्या सूचना किंवा माहिती हीदेखील अंतिमतः ०१ च्या यंत्रभाषेमध्ये कशी भाषांतरित करायची यासाठी काही काही भाषा व भाषांतरप्रणाली निर्माण केल्या गेल्या.त्या प्रणालींना कंपायलर आणि असेंब्लर असे म्हणतात. कंपायालर्सना समजणारी जी भाषा ती म्हणजे संगणककार्यप्रणालीचा सोर्स कोड.
हा सोर्स कोड म्हणजे आपल्यासाठी संगणकासाठीची सूचनाप्रणाली. तो कसा लिहावा यासाठी काही संगणक भाषा विकसित केल्या गेल्या. या भाषा आणि सूचनाप्रणालींशिवाय संगणक म्हणजे,मेंदूशिवाय असलेला एखादा माणूस किंवा प्राणी.
सोर्स कोड ( व्यावहारिक भाषेतील सूचना )~~~~~~(कंपायलर)~~~~~(असेंब्लर्स)~~~~(०-१ ची यंत्रभाषा)
)
संगणकप्रणालींवर स्वामित्व याचा नेमका अर्थ काय ?
या संगणकप्रणाली विकसित करण्यासाठी संगणकाच्या कार्याचे ग्न्यान , विशिष्ट रीतीने विचार करण्याचे कौशल्य आणि पद्धती यांची आवश्यकता असते.त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ती संगणक प्रणाली विकसित केल्यानंतर ती दुसऱ्याला वापरण्यासाठी देताना त्यासाठी विकासकाने काही किंमत घेणे स्वाभाविकच आहे. प्रश्न आहे की, एकदा ती प्रणाली विकल्यानंतर ती विकत घेणाऱ्याचे आणि विकणाऱ्याचे कोणते अधिकार असावेत याचा. स्वामित्व अधिकारसमर्थकांचे म्हणणे आहे की, संगणकप्रणाली विकताना फक्त ती विशिष्ट कारणासाठी वापरण्याचा अधिकारच द्यावा. ती संगणकप्रणाली काय आहे म्हणजेच, त्याचा सोर्स कोड ग्राहकाला देण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण बाजारातून एखादे यंत्र आणले, तर ते तयार करण्याचे तंत्र आपण त्यासमवेत विकत घेत नाही. त्या यंत्राचे उत्पादन करण्याचे अधिकार आपल्याला आपोआप त्या यंत्राच्या खेरदीसमवेत मिळत नाहीत. त्याचप्रमाणे एखाद्या संगणकप्रणालीच्या ग्राहकाचा अधिकार फक्त ती विशिष्ट हेतूसाठी वापरण्यापुरता मर्यादित असला पाहिजे. त्यामध्ये काहीही बदल करायचा असेल, तर त्यासाठी त्याने त्याच्याच उत्पादकाकडे यायला हवे. संगणकप्रणालीवरील स्वामित्व अधिकार याचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.
· वापराचा अधिकार-संगणकप्रणाली विकासकाच्या परवानगीशिवाय आणि त्याच्या अटी मान्य केल्याशिवाय ती कोणालाही वापरता येणार नाही.
· माहितीचा अधिकार –संगणकप्रणाली विकासकाच्या परवानगीशिवाय त्याच्या सोर्स कोडची माहिती देता-घेता येणार नाही.माहिती झाल्यास त्यात कोणताही बदल करता येणार नाही. तसेच अन्य प्रणालींच्या विकासामध्ये तिचा वापर करता येणार नाही.
· प्रती काढण्याचा अधिकार- संगणकप्रणालीच्या विकासकाच्या परवानगीशिवाय त्या प्रणालीच्या प्रती काढता येणार नाहीत.विकता येणार नाहीत.
कायद्याच्या भाषेमध्ये सांगायचे तर, संगणकप्रणालीवरील स्वांमित्व अधिकार हा एखाद्या कविता किंवा वाङमयीन कालकृतीच्या लेखकाला स्वतःच्या निर्मितीवर मिळणाऱ्या अधिकाराप्रमाणेच असतो.
(मात्र ती प्रणाली एखाद्या यंत्राचा भाग बनवून त्या यंत्राच्या कार्यासाठी वापरण्यात येत असेल, तर त्यावर मात्र पेटंट म्हणजे उत्पादक मक्तेदारीचा अधिकार प्राप्त होतो. जसे एखाद्या मोबाईलमध्ये, सध्याच्या कार्समध्ये, सूक्ष्मतरंग शेगड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणाली. सध्या तांत्रिकतेमध्ये न जाता पेटंट आणि कॉपीराईटमधील फरकाचा मुद्दा बाजूस ठेवू).
या उलट स्वामित्व अधिकाराच्या विरोधात असणाऱ्यांचे, म्हणजेच मुक्त संगणकप्रणाली समर्थकांचे म्हणणे असे आहे की, संगणकप्रणालीच्या ग्राहकाला ती खरेदी केल्यानंतर ४अधिकार मिळायला हवेत.
ते असे-
1. ती संगणक प्रणाली कोणत्याही कारणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर अनिर्बंध वापरण्याचा अधिकार,
2. त्याचा सोर्स कोड मिळण्याचा अधिकार,
3. त्या सोर्स कोड मध्ये स्वतःच्या नावाने आणि जबाबदारीवर कोणतेही फेरफार करण्याचा अधिकार,
4. विकत घेणाऱ्याला हेच सर्व अधिकार प्रदान करून ,त्या सुधारित प्रणालीच्या प्रती विकण्याचा अधिकार.
वरील दोन्ही भूमिकांच्या समर्थनार्थ कोणते मुद्दे सांगण्यात येतात, ते आता आपण पाहू.
स्वामित्व अधिकारसमर्थकांची भूमिका.
1. बौद्धिक स्वामित्व अधिकारामुळेच प्रणाली विकसित करणाऱ्याला त्याच्या कामाचा/ गुंतवणुकीचा मोबदला मिळतो. – संगणकप्रणालीच्या विकासासाठी कित्येक प्रशिक्षित व्यक्तिंना त्यांचा वेळ द्यावा लागतो. ते अनुभवी असल्यासच प्रणाली निर्दोष होते.निर्माण केली जाणारी प्रणाली विकली जाईलच याची कोणीही खात्री देवू शकत नाही. म्हणजेच ही सर्व गुंतवणूक वाया जाण्याचादेखील धोका कायमच असतो. परिणामी संघटन, आस्थापना, वेतन, यावर होणारा खर्च तसेच , हे धोके पत्करल्याबद्दल वाजवी नफा मिळणे आवश्यक आहे.तरच भविष्यात कोणीही संगणकप्रणालीच्या विकासाकडे वळेल. यासाठी विकासकाला त्याच्या निर्मितीच्या प्रती किंवा वापर किंवा विक्री त्याच्या परवानगीशिवाय दुसरा कोणीही करू शकणार नाही. याची खात्री असली पाहिजे. ती फक्त स्वामित्व अधिकारामधूनच मिळू शकते. जर स्वामित्व अधिकार नसेल, तर त्याच्या विकासकाला जगणेच शक्य होणार नाही. आणि संगणकप्रणालींची निर्मिती होणेच थांबेल.
2. जाहिरात, प्रसिद्धी यांच्यामध्ये खर्च करण्याचा अवसर प्राप्त -
3. संगणक प्रणालीच्या योग्यतेबद्दल जबाबदारी व निर्दोषता - बौद्धिक स्वामित्व अधिकारामुळे , ग्राहक अधिकाराची देखील निर्मिती स्वाभाविकपणेच होते. कारण संगणकप्रणालीच्या दोषांबद्दल स्वामित्व अधिकार सांगणाऱ्या विकासकाला जबाबदारी स्वीकारावीच लागते.ग्राहक त्याच्याविरोधात न्यायालयात जावू शकतो. त्यामुळे प्रणालीच्या निर्दोषत्वाची शक्यता तयार होते.
4. स्वामित्व अधिकारामुळे स्पर्धकावर मात करण्यासाठी साधन प्राप्त- स्वामित्व अधिकार असणाऱ्या संगणकप्रणाली या किंमतीवरच उपलब्ध असतात.मोफत नाही. त्यासाठी काही गुंतवणूक करावी लागते. तशी गुंतवणूक करून त्याच्या उपयोगाने एखादी उद्योगसंस्था स्वतःचे वैशिष्ट्य़ निर्माण करून आपला दर्जा सुधारू शकते आणि स्पर्धक संस्थापेक्षा पुढे जाऊ शकते.त्यातून अंतिमतः समाजाला उपलब्ध असणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचा दर्जा वाढण्यामध्ये होतो.
अशा प्रकारे संगणकीय प्रणालींच्या विकासकांना अशा प्रकारचे बौद्धिक स्वामित्व अधिकार दिल्यामुळे त्यांना प्रणालींचा विकास करण्यासाठी उत्तेजन मिळते. ते कार्य करण्यासाठी जास्तीत जास्त बुद्धिमान व्यक्ती त्याकडे आकर्षित होत जातात. तसेच जबाबदार रीतीने प्रणालींचा विकास होतो, आणि आपापल्या क्षेत्रातील स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी समाजातील उद्योगसंस्थांनाकडून त्यांच्या विकासासाठी जास्तीत जास्त मागणी नोदविली जाते, असे संगणकप्रणालींवरील बौद्धिक स्वामित्व अधिकारांच्या समर्थकांकडून मांडले जाते.
आता आपण त्याबाबतची सत्यता पुढील लेखामध्ये पडताळून पाहू. मात्र आपल्याला त्याचा विचार करण्यासाटी संगणक प्रणालींचा विकास कसा होत गेला त्याचा थोडा इतिहास पाहणे आवश्यक आहे.
- अजित अभ्यंकर
No comments:
Post a Comment